पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत बाहेर काढणार : मुख्यमंत्री   

पुणे : पाकिस्तानचे जे नागरिक व्हिसा घेवून महाराष्ट्रात आले आहेत, त्यांची सर्व माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटलेली आहे. त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत आणि त्यांना परत पाठविण्याची व्यवस्था झालेली आहे. ते परत जात आहेत. त्यांना ४८ तासांमध्ये बाहेर काढायचे आहे. त्यावर पोलिस व्यवस्थित काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तसेच, कोणी पाकिस्तानी अवैधरित्या आला असेल, तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया निरंतर सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेनिमित्त फडणवीस शनिवारी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अवैध कोणी आला असेल, तर शोधमोहीम कायमच सुरु असते, असे सांगून फडणवीस म्हणाले, साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आढळतात, त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी आढळत नाहीत, त्यामुळे पहिल्यांदा प्राधान्य हे जे व्हिसा घेवून आलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यावर आहे.
 
पाकिस्तानमधील काही जण भारतात उपचार घेण्यासाठी आल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ज्या प्रकारे आपण सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले आहे, तसेच पाकिस्तानात देखील तेच करत आहे. त्यामुळे मला असे वाटते की, मानवतेच्या दृष्टीकोनातून आपली सहानुभूती असतेच; पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि अस्मितेचा विषय येतो, त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात. पाकिस्तानच्या सरकारला समजले पाहिजे की, त्यांची निर्भरता भारतावर आहे. दहशतवादाला ते समर्थन देतात. आज जगातील कोणताही देश पाकिस्तानसोबत उघडपणे उभा राहू शकत नाही, ही पाकिस्तानची परिस्थिती आहे, तसेच पाकिस्तानकडे खायला पैसे नाहीत, तेथील जनता भुकेने मरत आहे. नागरिक आणि न्युक्लीअर बॉम्बचे सांगत आहेत, पाणी अडविण्यास भारताने सुरुवात केली तर पाकिस्तानला तहानेने मरण्याची वेळ येईल हा अतिशय योग्य निर्णय आहे. अशा प्रकारची जागा दाखवावी लागते. काही लोक आपल्याकडे असे आहेत की, त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहेत. त्यांना देशाच्या प्रती काहीच वाटत नाही, मला अशा लोकांची कीव येते.
 
भोरमध्ये संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. काँग्रेस राहते की नाही या प्रश्नावर ते म्हणाले, काँग्रेस स्वत: स्वत:ला शिल्लक ठेवत नाही. २०३४ पर्यंत  फडणवीस मुख्यमंत्री राहतील, या महसूलमंत्री बावनकुळे यांच्या विधानावर फडणवीस म्हणाले, बावनकुळे यांच्या मनात आले तर मला १०० वर्ष ते मुख्यमंत्री ठेवतील. त्यांच्या शुभेच्छांमधील मथितार्थ समजून घ्या. माझ्या चांगल्यासाठी आहेत. राजकारणात भूमिका बदलत असतात, ती बदललीही पाहिजे. कोणी दीर्घकाळ राहात नाही. त्यामुळे जेव्हा माझी भूमिका बदलायची तेव्हा ती बदलेल, असेही त्यांनी सांगितले.
 
असे चालणार नाही
 
बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या पोलिसांविषयी वक्तव्यानंतर फडणवीस म्हणाले, पोलिसांबद्दल असे बोलणे योग्य नाही. शिंदे साहेबांनी त्यांना कडक समज द्यावी, हे योग्य नाही, असे चालणार नाही. वारंवार ते असे बोलत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Related Articles